DONALD TRUMP: ट्रम्प यांची अपेक्षित चाल

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तासूत्रे हाती घेताच जाहीर केलेल्या धोरणात्मक निर्णयांमध्ये अनपेक्षित असे काही नाही. ‘अमेरिका फर्स्ट’ असा नारा देऊन निवडणुकीच्या प्रचारात बोलत होते, ते प्रत्यक्षात आणण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. अमेरिकेच्या हितांना प्राधान्य देण्याची त्यांची भूमिका त्या देशाच्या दृष्टिकोनातून योग्य वाटत असली, तरी त्या देशाच्या आजवरच्या भूमिकांना छेद देणारी आहे. आयात मालांवर शुल्क आकारणारे देश ‘संरक्षणवादी’ भूमिका घेत असल्याचा आरोप अमेरिका आजवर करीत आली आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात संरक्षणवादाच्या या भिंतीला तडे निर्माण करण्यात अमेरिकेचा वाटा मोठा आहे. मात्र, आता खुद्द अमेरिकाच आपल्या उद्योगांना आणि उत्पादनांना संरक्षित करत आहे. चीनसह अनेक देश आपली उत्पादने अमेरिकेत खपवत असून, त्यामुळे अमेरिकेचे नुकसान होत असल्याची लोकप्रिय मांडणी ट्रम्प करीत आले आहेत. कॅनडा, मेक्सिको यांच्या उत्पादनांवर २५ टक्के आणि चिनी उत्पादनांवर दहा टक्के आयातशुल्क आकारण्याचा ट्रम्प यांचा ताजा निर्णय हा या मांडणीचाच भाग. या तिन्ही देशांनी ‘जशास तसे’ उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे. युरोपीय संघासह अन्य देशांबरोबरही ट्रम्प अशीच भूमिका घेण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवातच त्यांनी एका व्यापारयुद्धाने केली आहे. त्याचे परिणाम काय होतील, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.कॅनडा, मेक्सिको, चीन या देशांबरोबरील अमेरिकेचा व्यापार समान पातळीवरील नसून, त्यातील अमेरिकेची तूट तब्बल एक लाख कोटी डॉलर असल्याचे नमूद करून आपला निर्णय अमेरिकाहिताचा असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. कॅनडाचा अमेरिकेशी असलेल्या व्यापाराचा आकार त्या देशाच्या एकूण उत्पन्नाच्या (जीडीपी) ६७ टक्के आहे. मेक्सिकोत हे प्रमाण तेथील ‘जीडीपी’च्या ७३ टक्के आणि चीनमध्ये ते तेथील ‘जीडीपी’च्या ३७ टक्के आहे. हे प्रमाण पाहता अमेरिकेने आयातशुल्क वाढविल्यानंतर त्या देशांवर परिणाम होणे साहजिकच आहे. त्यामुळेच या देशांनीही अमेरिकेला याच पद्धतीने प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेणे स्वाभाविक आहे. अमेरिकेच्या १५५ अब्ज डॉलरच्या वस्तूंवर २५ टक्के आयातशुल्क आकारले जाईल, असा इशारा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दिला आहे. अमेरिकेची बाजारपेठ हवी असल्यास एक तर आमच्या देशात उत्पादन करा किंवा त्यावरील कराला सामोरे जा, अशी ट्रम्प प्रशासनाची थेट भूमिका आहे. याबाबतचा निर्णय प्रत्यक्षात आल्यास अमेरिकेला लाभ होईल, असा दावा आहे. प्रत्यक्षात यामुळे अमेरिकी नागरिकांना महागाईला सामोरे जावे लागेल, असे तेथील जाणकारांचे म्हणणे आहे. अमेरिकेने काहीही आयात करू नये, असे ट्रम्पना वाटते काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. खुल्या वातावरणासाठी ख्यात असलेल्या अमेरिकेला ट्रम्प अधिकाधिक बंदिस्त करीत आहेत; मात्र याचा फटका अमेरिकेतील सर्वसामान्यांना बसण्याची भीती आहे. या निर्णयामुळे परदेशी वस्तू महाग होतील; परिणामी महागाईचा दर ०.४ टक्क्याने वाढेल, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करीत आहेत. यामुळे अमेरिकेचा वृद्धिदरही कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करीत विरोध करणाऱ्यांना ट्रम्प यांनी ‘टारिफ लॉबी’ असे म्हणत फटकारले आहे.पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी चीनच्या विरोधात व्यापारयुद्ध छेडले होते. त्यावेळी त्याचा भारताला फायदा झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे एकमेकांचा उल्लेख ‘आपला मित्र’ असा करीत असतात; परंतु, ट्रम्प यांनी प्रचारात भारताविरोधात तोंडसुख घेतले होते. सत्तेवर येताच त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांचा फटका भारताला बसणार आहे. भारतीय उत्पादनांवरील आयातशुल्काचा उल्लेख ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात केला होता. कॅनडा, मेक्सिको, चीन यांवर आयातशुल्क लादताना त्यांनी ते भारतावर लादलेले नाही. मात्र, त्यांची ‘संरक्षणवादी’ भूमिका पाहता भारतीय उत्पादनांवर आयातशुल्काची टांगती तलवार आहे. ट्रम्प यांची कार्यशैली पाहता ती कधीही चालू शकते. ताज्या निर्णयावर भारताने दिलेली प्रतिक्रिया सावध आहे. ‘आम्ही संरक्षणवादी आहोत,’ असे आम्हाला सुचवायचे नसल्याचे भारताने म्हटले आहे. ट्रम्प यांच्या व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होतो का, हे पाहावे लागेल. मात्र, जागतिकीकरणाचा रेटा वाढत असताना ट्रम्प यांचे निर्णय कालसुसंगत नाहीत. अमेरिकेला महान बनविण्याच्या नादात ते टोकाचा राष्ट्रवाद गोंजारत आहेत. हा नवा आक्रमक राष्ट्रवाद जागतिकीकरणाची नव्याने कशी मांडणी करतो, हे येणारा काळच ठरवील.

2025-02-04T07:08:36Z