ASSEMBLY ELECTION | पालघरात बहुतांश मतदारसंघात तिरंगी लढत होणार

पालघर

पालघर सहा मतदार जिल्ह्यात विधानसभा संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महाविकास आघाडी, महायुती, मनसे या प्रमुख पक्षासह बहुजन विकास आघाडी, जिजाऊ विकास पार्टी मार्फत उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर हे चित्र आणखीन सुस्पष्ट होणार आहे.

पालघर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक घडामोडी घडल्यानंतर अखेर शिवसेनेमार्फत भाजपमधून शिवसेनेत घुमजाव केलेले राजेंद्र गावित यांनी तर ठाकरे गटाच्या जयेंद्र दुबळा यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मनसेमार्फत नरेश कोरडा यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात समोरासमोर तीन पक्ष असले तरी खरी लढत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी राहणार आहे.

राजेंद्र गावित व जयेंद्र दुबळा हे आमने-सामने असले तरी एकमेकांचे स्नेही आहेत. त्यामुळे या मतदारसंघात दोघांपैकी कोण बाजी मारणार हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांवर जड ठरणार असल्याचे दिसून येते. तर मनसे काही मते घेऊन महायुतीला डॅमेज करू शकते सांगितले जाते.

डहाणू विधानसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचा मित्र पक्ष माकपचे विद्यमान आमदार विनोद निकोले यांना पुन्हा एकदा उमेदवारी देऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, माकप समोर भाजपने विनोद मेढा या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट दिल्याने ही निवडणूक सहज सोपी होणारी नाही, त्यामुळे माकप समोर भाजपचे मोठे राजेंद्र गावित विनोद निकोले सुनील भुसारा राजेश पाटील क्षितीज ठाकूर हितेंद्र ठाकूर आव्हान असणार आहे.

या विधानसभा मतदारसंघात माकप विरुद्ध भाजप अशी खरी रंगी लढत आहे. विक्रमगड मतदार संघ हा महायुतीच्या जागा वाटपात भाजपकडे गेल्याने या मतदार संघात मोठा मतदार असलेल्या शिवसेनेमध्ये नाराजी पसरली आहे. याचा फटका भाजपला बसण्याची दाट शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व उमेदवार सुनील भुसारा यांना महायुतीतील खटक्यांचा फायदा होईल असे सांगितले जाते. या मतदारसंघामध्ये भाजप तर्फे हरिचंद्र भोये यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. निकम यांनी निवडणूक लढवल्यास महायुतीचे भाजप उमेदवार भोये यांचा पराजय निक्षित असल्याच्या चर्चा सध्या येथे राजकीय गोटात रंगत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध अपक्ष अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात जिजाऊ विकास पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मात्र विक्रमगडमध्ये मनसेमार्फत सचिन शिंगडा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांनी काही मते मिळवल्यास येथे महायुतीला आणखीन त्रासदायक ठरणार असल्याचे सांगितले जाते. मात्र महायुतीतील मित्रपक्ष एकत्रित होत महाविकास आघाडीवर मात करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ही निवडणूक महा विकास आघाडीला हलक्यात घेऊन चालणार नाही.

बोईसर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून डॉ. विश्वास वळवी, बहुजन विकास आघाडी मार्फत राजेश पाटील, शिवसेनेमार्फत बिलास तरे मनसेमार्फत शैलेश भुतकडे तर जिजाऊ विकास पार्टी मार्फत नरेश धोडी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अनेकांनी या मतदारसंघाच्या उमेदवारीवर आपला दावा केला असला तरी या मतदारसंघात प्रमुख लढत ठाकरे सेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी विरुद्ध शिवसेना अशी राहणार आहे.

या मतदारसंघात मनसेची काही मते आहेत व गेल्या एक-दोन वर्षात जिजाऊ विकास पार्टीमार्फत येथे चांगले सामाजिक काम केल्यामुळे काही मते त्यांच्या पारड्यात पडणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल असे सांगितले जाते. बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे व त्यांनी केलेल्या भरघोस कामांच्या जोरावर ते निवडून येतील असे सांगितले जात असले तरी शिवसेना व ठाकरे गट यांचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. या मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता आहे.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे राजन नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितीज ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदार लक्षात घेता मर्ताच्या ध्रुवीकरणासाठी मवीजाने काँग्रेसकडून संदीप पांडे यांना उमेदवारी दिली आहे. तर येथे प्राबल्य असलेले धनंजय गावडे यांनी प्रहार जनशक्ती मार्फत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

या मतदारसंघात बहुजन विकास आषाडी विरुद्ध भाजप विरुद्ध मवीआ व प्रहार जनशक्ती अशी लढत असणार आहे. बहुजन विकास आघाडीचे या मतदारसंघात प्राबल्य असले तरी लोकसभेमध्ये भाजपाला मिळालेली मते लक्षात घेता बहुजन विकास आघाडीला भाजपचे मोठे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे प्रहार जनशक्ती व काँग्रेस यांचेही आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. त्यामुळे या लढतीत मतदार कोणाला कौल देतात हे मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे वसई मतदारसंघ हा बहुजन विकास आघाडीचा प्रमुख बालेकिल्ला आहे.

या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सातव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीच्या भाजपकडून स्नेहा दुबे यांनी अर्ज दाखल केला असून महा विकास आघाडीच्या काँग्रेसचे विजय पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघासाठी दाखल केला आहे. या मतदारसंघात बहुजन विकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी तिरंगी लढत रा हणार आहे.

स्नेहा दुबे या श्रमजीवीच्या विवेक पंडितांच्या कन्या असल्यामुळे त्यांच्याकडे मतांचा कील आहे. तर विद्यमान आमदार हितेंद्र ठाकूर यांचा या मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. वसईच्या काही भागांमध्ये महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांचे चांगले प्राबल्य असल्यामुळे तेथे विजय पाटील यांना मते मिळण्याची शक्यता आहे.

ही निवडणूक येथे चुरशीची ठरणार असून मतांचे प्राबल्य लक्षात घेता या मतदारसंघात तिरंगी लढत स्पष्ट आहे त्यामुळे उमेदवारांचा येथे कस लागणार आहे. पालघर जिल्ह्यात सहा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशा प्रमुख लढती असून बोईसर, वसई, नालासोपारा या मतदारसंघांमध्ये बहुजन विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांसमोर आव्हानात्मक ठरणार आहे.

तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मनसे मार्फत उमेदवार दिल्याने काही मते मनसेच्या पारड्यात पडल्यास महायुतीला त्याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच पालघर जिल्ह्यात आपले स्थान निर्माण केलेले जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे या तीन पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. विधानसभांमध्ये विविध रंगी लढती पाहायला मिळणार आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच जिल्ह्यात खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

2024-10-30T07:25:18Z