किणी : राजकुमार चौगुले
दीपावलीच्या पूर्वसंध्येला वडगावच्या बाजारपेठेने गर्दीचा उच्चांक केला. प्रत्येक ठिकाणी खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीने व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूकही ठप्प झाली होती.
दिवाळीच्या सणाला नवनवीन कपडे आणि गोडधोड पदार्थांची जरी रेलचेल दिसून येत असली, तरी अगदी दिवाळीनिमित्त घर सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तुंनी वडगावची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजलेली आहे. दुकानात खेरीदी-विक्रींची मोठी उलाढाल बघावयास मिळत आहे. दुकानात महिला, बच्चे मंडळी खरेदीसाठी धुम करीत आहेत. पारंपरिक दिवाळी साजरी होत असताना त्याला आधुनिकतेचा स्पर्श होत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात दिवाळीची खरेदी केली जाते. त्या पार्श्वभूमीवर वडगाव बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासोबतच फुले, बत्तासे, लाह्या, सुगंधी उटणे, मिठाई, सुकामेवा, गिफ्ट, आकाश कंदील, तोरण, झुंबर, पाण्यातील दिवे, रांगोळ्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वडगाव शहरातील दिवाळीचा मुख्य बाजार आबांचा पुतळा ते पद्मारोड, पालिका चौक, बिरदेव चौक रोड दरम्यान भरलेला असतो. या मार्गावर असलेल्या दुकानात सध्या गृहसाजावटीसह अन्य वस्तुंची रेलचेल असून ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. दिवाळी निमित्त व्यापाऱ्यांनी आकर्षक साहित्य विक्रीस आणले आहे.
बाजारात सध्या मिठाईच्या गिफ्ट पॅकची मागणी वाढली आहे. त्यामध्ये मिक्स फरसान, चिवडा, शेव, सोनपापडी, डाळ, नमकिनसोबत बंगाली मिठाई आदींसह रेडीमेड गिफ्ट पॅक उपलब्ध असून बदाम, काजू, अंजिर, अक्रोट, पिस्ता, किसमीसचे बॉक्स, गोल, चौकोणी आकारात सुकामेवा भरलेले गिफ्ट पॅक पाचशे रुपयांपासून उपलब्ध आहेत. सराफी दुकानासह इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल विक्रीच्या दुकानातही गर्दी वाढत आहे. या वाढत्या गर्दीमुळे मात्र वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. परगावाहून येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या पार्किंगचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याने दूरवर पार्कींग करावे लागत आहे.
2024-10-31T02:40:18Z