जळगाव : शहरातील वाहन शोरूममध्ये चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड करत लाखो रुपयांचे नुकसान केल्याची घटना रविवारी (दि.2) रोजी मध्यरात्री घडली आहे. चोरट्यांच्या हाती दहा ते अकरा हजार रुपये लागले मात्र लाखो रुपयाचे नुकसान त्यांनी शोरूम मध्ये केले आहे. या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
शहराच्या मधून जाणाऱ्या जळगाव-भुसावळ महामार्गावर तरसोद फाट्याजवळ असलेल्या चौधरी टोयोटा या चारचाकी वाहनाच्या शोरूममध्ये चोरट्यांनी रविवारी (दि.2) मध्यरात्री प्रवेश करून शोरूमच्या डिलिव्हरी सेक्शनमधील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दोन तास शोधाशोध करून ही शोरूममध्ये मोठी रोकड सापडत नसल्याने त्यांना 10 ते 11 हजार रुपये मिळाले. चोरीपेक्षा मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याने शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे.
लॉकर, ड्रॉवर, कॅबिनेट आणि इतर वस्तूंची नासधूस करण्यात आली आहे. हा संपूर्ण प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चोरटे रात्री 12 वाजता शोरूममध्ये शिरले आणि पहाटे 2 वाजता बाहेर पडल्याचे दिसून येत आहे. त्याच रात्री चौधरी टोयोटामधून काही हाती न लागल्याने चोरटे नंतर सातपुडा ऑटोमोबाईलमध्ये दाखल झाले. येथेही चोरट्यांना काहीही हाती लागले नाही. मात्र, तोडफोड करत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले. चोरट्यांनी येथे तब्बल चार तास धुमाकूळ घातला. ते पहाटे चार वाजेपर्यंत शोरूममध्ये होते आणि हा संपूर्ण प्रकारही सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
या दुहेरी चोरीच्या घटनेनंतर शहरातील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे., चोरट्यांचा शोध सुरू आहे. शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण असून सुरक्षा यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. व्यापाऱ्यांनीही त्यांच्या दुकान आणि शोरूमसाठी अधिक मजबूत सुरक्षा यंत्रणा बसवावी, असा सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.
2025-02-04T08:34:34Z