KDMC BRIBE CASE | केडीएमसीच्या लाचखोर कर्मचाऱ्याची मालमत्ता जप्त

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बाजार व परवाना शुल्क विभागातील लिपिक प्रशांत धिवर याला एका मटण विक्रेत्याकडून दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.31 जानेवारी) रंगेहाथ पकडले होते.

पोलिस कोठडीत 24 तास उलटून गेल्याने आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी लिपिक धिवर याला नियमाप्रमाणे सेवेतून निलंबित करून खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे. तर दुसरीकडे लाचविरोधी पोलिसांनी घेतलेल्या झडती दरम्यान लिपिक धिवर याच्या घरात 16 लाखांची रोकड हाती लागली आहे. शिवाय स्थावर आणि जंगम मालमत्तेची देखिल चौकशी सुरू करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यानंतर लिपिक प्रशांत धिवर याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिलेल्या जबानीत आपण ही लाच सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांच्यासाठी स्वीकाल्याचा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. स्थानिक बाजारपेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणी अहवालात नमूद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आयुक्त डाॅ. इंदूराणी जाखड यांनी सहाय्यक आयुक्त ठाकूर आणि उपायुक्त अवधूत तावडे यांना कारणे दाखवा नोटिसा पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागितला आहे. या खुलाशानंतर योग्य त्या कार्यवाहीचा निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त डॉ. जाखड यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

कल्याणच्या शंकरराव चौकातील मयूर अप्लायन्सेस दुकानासमोर असलेल्या चहाच्या टपरीजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी प्रशांत धिवर याल दीड लाख रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. धिवर याच्या कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी चौकात असलेल्या आलिशान घरात घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्या घरात 16 लाखांची रोख रक्कम पथकाच्या हाती लागली. ही रक्कम कुठून आणली ? ती कुणाला देण्यात येणार होती ? याची कोणतीही माहिती देण्यास धिवर याने चौकशी अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली. या प्रकरणासह धिवर याने दिलेल्या जबानीनुसार उर्वरित दोन अधिकाऱ्यांची चौकशी करायची असल्याने पथकाने कल्याण न्यायालयात धिवर याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून धिवर याला बुधवारपर्यंत (दि.5) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Thane : केडीएमसीचा बाजार परवाना विभाग लाचखोरीच्या गर्तेत

कल्याणच्या जुन्या मासळी बाजाराजवळच्या मौलाना शौकत अली चौकात एका मटण विक्रेता आहे. त्याला आपल्या व्यवसायाचा परवाना अन्य एका विक्रेत्याला हस्तांतरीत करायचा होता. ही प्रक्रिया करण्यासाठी विक्रेत्याने केडीएमसीच्या बाजार व परवाना शुल्क विभागात विहित नमुन्यात अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला. या विभागातील लिपिक प्रशांत धिवर याने विक्रेत्याकडे अर्ज स्वीकारणे आणि परवाना हस्तांतरीत करणे कामासाठी दोन लाखांची मागणी केली होती. दोन लाखांऐवजी दीड लाखांवर तडजोड करण्यात आली. याच दरम्यान मटण विक्रेत्याकडे लिपिक प्रशांत धिवर याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैसै द्यावे लागतील असे सांगून पैशांसाठी तगादा लावला. हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. तगाद्याला वैतागलेल्या मटण विक्रेत्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष अंबिके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर लिपिक प्रशांत धिवर याच्या भोवती कारवाईचा फास करकचून आवळला. अखेर मटण विक्रेत्याकडून दोन पैकी दीड लाखांची लाच स्वीकारताना धिवर रंगेहाथ पकडला गेला. या घटनेनंतर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

धाक-धमक्यांनी भयभीत रहिवाशांची मागणी

वैयक्तिक कर आकारणी संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांना जोडून वारंवार स्मरणपत्र देऊनही केवळ शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात येतो. वेळप्रसंगी धाक-धमक्या देखिल दिल्या जातात. सर्वसामान्य नोकरदार रहिवासी अशा प्रकारांमुळे भयभीत झाले आहेत. उघडपणे बोलण्यास इन्कार करणाऱ्या काही रहिवाशांनी आपापल्या व्यथा मांडल्या. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकाऱ्यांची देखिल खातेनिहाय गोपनीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी २७ गावांतील मन:स्ताप झालेल्या रहिवाशांनी केली आहे.

ठाणे : केडीएमसीचा लाचखोर लिपिक पोलिसांच्या जाळ्यात

केडीएमसीतील लिपिक प्रशांत धिवर 44 वा लाचखोर

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आत्तापर्यंत 30 वर्षांच्या काळातील लिपीक प्रशांत धिवर याच्या माथ्यावर 44 वा लाचखोर असा शिक्का बसला आहे. गेल्याच वर्षी डोंबिवलीच्या ह प्रभागात मालमत्ता कर विभागातील योगेश महाले आणि सूर्यभान कर्डक हे दोघे कर्मचारी 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पथकाने पकडले होते.

नागरी सेवेतील असले गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने केडीएमसीतील नागरी हक्काच्या 118 सेवा अधिसूचित केल्या आहेत. 32 सेवा ऑनलाईन सुरू आहेत. सर्वच सेवा लवकरच ऑनलाईन करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षापासून प्रशासन ई ऑफीस प्रणाली राबवत आहे. शुक्रवारी लाचविरोधी पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेल्या लिपिक प्रशांत धिवर याला निलंबित करण्यात आले असून उर्वरित अधिकाऱ्यांचा खुलासा मागविला आहे, असे आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

2025-02-04T11:04:40Z