मनाची चेतना...

- डॉ. दत्ता कोहिनकर

बऱ्याच वेळेला लोकांच्या तोंडून वाक्य ऐकतो माझं मनच लागत नाही, माझ्या मनाला ते पटलेच नाही. माझ्या मनाला ते खूप लागले. सारा संसार हा मानवी मनाचा खेळ आहे. पण हे मन नेमकं काय आहे? कधी कधी हे मन म्हणजे दिल एक मंदिर असतं, तर कधी कधी हे मन म्हणजे दिल, दिवाना, पागल झालेलं दिसतं. कधी कधी हे भावनिक होऊन मनातलं सगळं सांगायला तयार होतं आणि म्हणतं, मेरे दिल मे आज क्या है, तू कहे तो मै बता दू... असं हे मन दिसत नसतं, पण त्याला मोजता पण येत नसतं. प्रकाशाच्या वेगापेक्षा याचा जबरदस्त वेग असतो. लोक म्हणतात, साखर गोड, गुलाबजाम गोड, पण माणसाचं हे मन जिथे जातं तेच त्याला गोड वाटायला लागतं. एक गोड मिळाल्यानंतर लवकरच त्यातली गोडी नष्ट होऊन ते दुसरं गोड शोधायला लागते. मन निर्मळ ठेवलं तर हे आयुष्याचा नंदनवन करतं. परंतु दूषित झालं तर हे आयुष्याची वाट लावतं.

कर्म करताना सर्व धर्मग्रंथांमध्ये मनाच्या चेतनेला फार महत्त्व दिल आहे...

जीवनात यशस्वी होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी मनाची चेतना मोलाची असते. चेतना म्हणजे हेतू. आपल्या कार्यामागे एक चांगला सबळ उद्देश असेल तर ती पूर्ण करण्यासाठी निसर्गाची खूप मदत होते. मानसशास्त्राच्या मते चांगला उद्देश आपल्याला सुरक्षितता देतो व त्यामुळे आपला शारीरिक व मानसिक विकासही होतो. एका गुन्हेगाराने एका इसमाला चाकूने एक इंच जखम केली व त्याच चाकूने डॉक्टरने त्याच इसमाला तेवढीच जखम केली तर दोघांना मिळणारे कर्मफळ वेगवेगळे असते, कारण डॉक्टरच्या मनाची चेतना आजाऱ्याचे ऑपरेशन करून त्याला रोगमुक्त करण्याचे असते, तर गुन्हेगाराने केलेली जखम ही त्या माणसाला लुटण्यासाठी केलेली असते. मनाचा हेतू हा फळ देतो म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘तुम्ही किती नि:स्वार्थी आहात, यावर तुमचे यश अवलंबून असते...’

आई मुलाला तो गरम तव्याकडे किंवा चुलीकडे जाऊ लागला तर जोराने दूर ढकलते. कधी कधी हे लहान लेकरू ढकलल्यानंतर जमिनीवर पडते व रडू लागते. पण आईने त्याला वाचविण्यासाठी ढकललेलं असतं. शेवटी मनाची चेतना महत्त्वाची. कुठलेही काम करण्यापूर्वी मनाची चेतना तपासून पहा. ती जर तुमच्या व समाजाच्या हिताची असेल तर निश्चितच निसर्ग तुम्हाला बळ देते आणि ईप्सित ध्येय साध्य करण्यासाठी मदत करते.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T06:27:56Z dg43tfdfdgfd