EPFO : ईपीएफओचा नवा नियम : आता काढा दुप्पट रक्कम

[author title=”जयदीप नार्वेकर ” image=”http://”][/author]

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मंडळाने पीएफ खात्यातून पैसे काढण्याशी संबंधित नियम बदलले आहेत. बदललेल्या नियमांमध्ये खातेदारांना दिलासा देण्यात आला आहे. आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1 लाख रुपये काढू शकतात. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती. आता ती दुप्पट करण्यात आली आहे. नवीन नियम 16 एप्रिलपासून लागू झाले आहेत.

गरजेनुसार पैसे काढू शकता

पीएफ खातेधारक त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या खात्यातून काही रक्कम काढू शकतात. ही रक्कम स्वत: किंवा कुटुंबातील सदस्यांशी संबंधित खर्च, घर बांधणे किंवा घर खरेदी आणि मुलांचे लग्न यासाठी काढता येते. तथापि, पीएफ खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम काढण्याची परवानगी नाही. ईपीएफओने नवीन नियमांमध्ये फॉर्म 31 च्या परिच्छेद 68 जे अंतर्गत विद्यमान मर्यादा 50 हजार रुपयांवरून 1 लाख रुपये केली आहे. या परिच्छेदाखाली पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या (आई, वडील, मुले इ.) गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी निधी काढू शकतात. तुम्हाला जी रक्कम काढायची आहे ती पीएफ खात्यात असावी हे लक्षात ठेवा.

या आजारांचा समावेश :

परिच्छेद 68जे अंतर्गत पीएफ खातेधारक कर्करोग, मानसिक आजार, टीबी, अर्धांगवायू इत्यादी गंभीर आजारांच्या उपचारांसाठी पैसे काढू शकतात. ही रक्कम काढण्यासाठी डॉक्टरांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. रक्कम काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करू शकता.

यासाठी पैसे काढू शकता

पीएफ खातेधारक फॉर्म 31 भरून खात्यातून काही रक्कम काढू शकतात. मात्र, ही रक्कम काही महत्त्वाच्या कामांसाठीच काढता येते. यामध्ये गृह कर्जाची परतफेड, घर खरेदी, मुलांचे लग्न किंवा उच्च शिक्षण इत्यादी कारणांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिव्यांगांसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठीही पीएफ खात्यातून पैसे काढता येतील.

2024-04-23T01:57:42Z dg43tfdfdgfd