तुमच्या कामावर विशेष लक्ष; देवेंद्र फडणवीस यांचा पदाधिकार्‍यांना गर्भित इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत जे माजी नगरसेवक चांगले काम करतील, त्यांचा विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत विचार केला जाईल. पण, जे कामात कमी पडतील, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाईल, असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत दिला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त शुक्रवारी पुण्यात फडणवीस यांच्या सभा झाल्या. त्यापूर्वी त्यांनी कोरेगाव पार्क येथील एका मंगल कार्यालयात पुणे महापालिका आणि कॅन्टोन्मेंट बोर्डामधील माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांची बैठक घेतली.

या बैठकीत त्यांनी पुणे शहर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या भागासह बारामती मतदारसंघातील खडकवासला आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, या बैठकीत माजी नगरसेवक सध्या नेमके काय काम करतात? याचा आढावा घेतला आहे. पुढील काळात काय करायचे आहे? याची दिशा दाखविली आहे. प्रचाराला चांगला प्रतिसाद आहे. प्रत्येक जण आपल्या परीने काम करीत आहे. त्यांच्या कामाचा लेखाजोखा ठेवला जात आहे, जे चांगले काम करतील त्यांचा सत्कार होईल. जे काम करणार नाहीत, त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राहुल गांधी टुरिस्ट

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत विचारले असता, ते म्हणाले, “राहुल गांधी हे टुरिस्ट आहेत. त्यांनी अमेठी किंवा रायबरेलीमधून अर्ज दाखल करावा. ते टुरिस्ट म्हणून जातात; मात्र त्यांचे घर बसत नाही.”

प्रचार म्हणजे दोन दिवसांचा इव्हेंट नाही

प्रचार हा दोन दिवसांचा इव्हेंट नाही, प्रत्येक दिवशी काम करणे आवश्यक आहे. चर्चा घडविणे गरजेचे आहे. महायुतीच्या की व्होटरकडे लक्ष द्या, तो मतदानाला कसा येईल ते पाहा, मतदान केंद्राजवळ मंडप उभारण्याचा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे करा, सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहचा, यादी वाचन करा, मतदाराशी संपर्क साधून त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर मतदान स्लिप पोहचवा, अशा विविध सूचना फडणवीस यांनी या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजारी असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: फोन करून विचारपूस करीत होते. उद्धव ठाकरे हे व्यक्तिगत शत्रू नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय विचार त्यांनी सोडले आहेत. पराभव दिसू लागल्याने विरोधकांकडून आकडेवारीच्या तफावतीचा खेळ सुरू केला जात आहे. त्यापेक्षा विरोधकांनी सर्वसामान्यांकडे जावे.”

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हेही वाचा

2024-05-04T04:05:58Z dg43tfdfdgfd